
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश दै
पणजी :- ‘द स्पेल ऑफ पर्पल’ या महिलांच्या धाडसाला सलाम करणारा, त्यांच्या धाडसी वृत्तीचे कौतूक करणारा चित्रपट आहे, त्याच वेळी पितृसत्ताक पद्धतींशी सतत लढा देतांना स्त्रियांना आलेला शारीरिक मानसिक शीण देखील या चित्रपटातून मांडला आहे. चेटकीण, करणी करणाऱ्या असल्याचा समज आपल्या देशातील हजारो महिलांबाबत आपल्या समाजात विनाकारण पसरवला जातो. कधी त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी तर कधी त्यांना निष्कारण त्रास देण्याच्या दुष्ट हेतूने, अशा अफवा पेरल्या जातात. या चित्रपटात हाच विषय हाताळण्यात आला असून, गुजरातच्या एका छोट्या आदिवासी पाड्यातल्या महिला एकत्रित येऊन या पितृसत्ताक व्यवस्थेतील अन्यायाशी कसा लढा देतात, यांची ही कथा असल्याचे दिग्दर्शक प्राची बजानिया यांनी सांगितले. 52 व्या इफ्फी दरम्यान आज गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत, छायाचित्रकार राजेश अमारा रंजन देखील यावेळी उपस्थित होते.