दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने परतवाड्यातील आठवडी बाजारात संशयास्पद स्थितीत बसलेल्या दोघांकडून दोन देशी कट्टे व चार जीवंत काडतूस जप्त केले.२० जानेवारी रोजी रात्री ही दमदार कारवाई करण्यात आली.यापुर्वी देखील १९ जानेवारी रोजी रात्री तेथील जयस्तंभ चौकातून देशी कट्टा बाळगून असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती.सलग दोन दिवसात परतवाड्यातून तीन देशी कट्टे पकडण्यात आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी रात्री अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांबाबत माहिती घेत असता परतवाडा आठवडी बाजारातील हॉटेल सुर्यकमल मागे मोकळया मैदानात शेराभाई ठाकुर हा एका दुचाकीवर गावठी देशी कट्टा घेऊन असल्याची टिप मिळाली.त्यावरून आठवडी बाजारातील हॉटेल मागे पाहणी केली असता दोन इसम काळया शर्टमध्ये काळया लाल रंगाच्या दुचाकीवर संशयितरित्या बसून असल्याचे दिसून आले.त्यांची अंगझडती घेतली असता शुभम उर्फ शेराभाई कुंजीलाल सेंगर ठाकुर (२८,रा.पेंशनपुरा,परतवाडा) याच्या कमरेत चंदेरी रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा व पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुस व दीपक उर्फ दिप्याभाई राममनोहर यादव (३७,देविनगर,लोहारा,यवतमाळ) याच्या कमरेत काळया रंगाचा गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतूस लोड केलेल्या अवस्थेत मिळून आले.
आरोपींकडे कट्टे व काडतूस बाळगण्याबाबत त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.आरोपी दिपक उर्फ दिप्याभाई यादव याने तो यवतमाळहून शेराभाई सेंगर याचे कडून गावठी कट्टा विकत घेण्याकरिता आला असल्याची कबुली दिली.आरोपींकडून देशी कट्टे,जिवंत काडतुसे,मोबाईल,दुचाकी असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधिक्षक शशीकांत सातव यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे,सहाय्यक फौजदार दीपक उईके,अंमलदार युवराज मानमाठे,रवींद्र वऱ्हाडे,स्वप्निल तंवर,सागर नाठे,कमलेश पाचपोर यांनी ही कारवाई केली.