दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : समस्त परभणीकरांचे स्वास्थ्य निरोगी राहिले जावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी योगसंध्या, भजन संध्या तर युवकांसाठी योग शिबीराचा लाभ देता यावा, त्याचबरोबर स्वतः योगगुरु बाबा रामदेव यांच्या करवी सुदृढ शरीरस्वास्थ्यासाठी परिपूर्ण असे योगाभ्यासाचे धडे परभणी करांना मिळावेत याच उदात्त हेतूने खा.संजय जाधव यांनी लोकभावना जागृत ठेवते हा उपक्रम हाती घेतला आहे. या आरोग्यदायी उपक्रमास हरिद्वार स्थित पतंजली योगपीठ यांचे अभूतपूर्व असे योगदान आणि राजे संभाजी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले जाणार आहे.
दि. २५, २६ आणि २७ फेब्रुवारी २०२३ या दिवसीय कालावधी दरम्यान आयोजित योग शिबीरात स्वतः गुरु रामदेव बाबा हे उपस्थित नागरिकांना स्वास्थ्याचे धडे देणार आहेत. एवढेच नाही तर रोगासाठी पुरक आणि प्रेरक अशी पुस्तके तथा मानवी आरोग्यासाठी नवसंजीवनी ठरलेल्या पतंजली निर्मित वस्तू व प्रसाधनांची दुकाने सुध्दा योगाचे परिसरात मोठ्या प्रमाणात लावली जाणार आहेत. नागरिकांसाठी मोफत चिकित्सा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नागरिकांसाठी हे शिबीर अगदी मोफत (निःशुल्क) आहे. दरम्यान योग अभ्यास आणि योग विद्येचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ज्यांना उदात्त अंतःकरणाने मदतीचे औदार्य दाखवायचे आहे, त्या दात्यांना रुपये अकरा हजारांची किंवा त्यापुढील रकमेची पावती उपलब्ध करुन विशेष पासची सोय केली जाणार आहे. जिल्ह्यातील मान्यवरांनाही पास दिले जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
सदर शिबीर सकाळी ५ ते ७.३० या दरम्यान पार पाडले जाणार आहे तर सायंकाळी ५ ते ८ दरम्यान योगपीठ हरिद्वारच्या वतीने पहिल्या दिवशी जेष्ठ नागरिकांसाठी योगसंध्या, दुसऱ्या दिवशी भजन संध्या आणि तिसऱ्या दिवशी युवकांसाठी योग शिबीर घेण्यात येणार आहे.
सदर शिबीराचे स्थळ निश्चित अद्याप झाले नसले तरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर हे शिबीर पार पाडले जाईल, याची शक्यता विश्वसनीय सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या शिबीराचा लाभ अधिकाधिक नागरिकांना घेता यावा यासाठीची इत्यंभूत माहिती प्रचार आणि प्रसाराद्वारे शहराच्या व ग्रामीण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सलग तीन दिवस पतंजली योग पीठाचे पदाधिकारी व स्थानिक पदाधिकारी सर्वत्र फिरुन करणार असल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.