दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मारहाणीच्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीसह त्याचा मुलगा व भाऊ या तिघांना जामीन मिळवून देणे व गुन्ह्यात मदत करणे यासाठी रुपये दहा हजारांची लाच स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस फौजदाराला परभणी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ छापा टाकून गजाआड केल्याची खळबळजनक घटना पाथरी येथे घडली.
“सद्रक्षणालय् खलनिग्रहणाय्” या बिरुदावलीस अनुसरून खाकी वर्दीची आन-बान-शान राखत आपले कर्तव्य बजावताना नागरिकांचे ही संरक्षण करणे हे क्रमप्राप्त असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा दरारा आणि रुबाब काही औरच असतो. किंबहुना त्यामुळेच ज्यांची नागरिकांमध्ये कमालीची भीती होती, त्याच अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून जेव्हा अटक केली जाते, तेव्हा जनतेत खळबळ माजली जाणे स्वाभाविक असले तरी स्वतःवर काय बितली असेल याचा विचार न केलेलाच बरा.
२० जानेवारी २०२३ रोजी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून असे समजते की, मारहाणीच्या एका प्रकरणात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सूर्यकांत रंगनाथराव राऊत यांनी स्वतः आरोपी, त्याचा मुलगा आणि भाऊ या तिघांनाही सदर गुन्ह्यात मदत करणे व जामीन मिळवून देणे प्रकरणी रुपये वीस हजारांची मागणी केली होती. त्यापैकीच रोख दहा हजार रुपये लाच म्हणून पंचासमक्ष राऊत याना देण्यात आले होते. त्याचाच परिपाक म्हणून म्हणून आरोपी सूर्यकांत राऊत यांना कर्तव्यावर असतांनाच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक किरण बिडवे, पो.नि.सदानंद वाघमारे, जकी कोरे, पोह. अनील कटारे, जनार्दन कदम, अतुल कदम, पोशि.शेख मुख्तार, विकास तायडे आदींच्या पथकाने या कारवाईत शिताफीने सापळा रचून दाखवलेली तत्परता फळास आली. या कारवाईमुळे पाथरी पोलिसांत प्रचंड खळबळ माजली गेली.