
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसह 13 दिवसांपासून आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात जवळपास अडीच तास बैठक पार पडली. या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिलस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांशी संबंधित हा विषय आहे. असं असतानाही साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले. या बैठकीतही कुठला निर्णय नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नाही, त्यांच्यात एकमत नसल्याचं स्पष्ट होतं, अशी खोचक टीका पडळकर यांनी केलीय.
विलिनीकरणाच्या मागणीबाबत विचारलं असता, कोर्टानं नेमलेल्या समितीबाबत परबांचं जे वक्तव्य आहे तेच कायम आहे. त्यापुढे जायला ते तयार नाहीत. सरकारनं अजून भूमिकाच घेतलेली नाही. मात्र, कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. सरकार कोर्टाचा दाखला देण्याशिवाय काही करत नाही. शेवटी आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काही असतं तर आम्ही 13 दिवस इथं थांबलो असतो का? असा सवालही पडळकर यांनी केलाय. तसाच पुढे बोलताना पडळकर म्हणाले
शरद पवार यांनी 50 वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलंय. मान्यताप्राप्त संघटना त्यांचीच आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्या संघटनांना बाजूला केलंय. त्यामुळे यांची पोळी भाजली जाणार नसल्याची चिंता यांना लागली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला त्यातून यांना काही मिळणार नाही. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येत नसल्याचा गंभीर आरोपही पडळकर यांनी केलाय.