दैनिक चालु वार्ता मोताळा/प्रतिनिधी/गणेश वाघ:-
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करून कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारी संस्था म्हणजेच कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, दिलीपभाऊ नाफडे यांना लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर पुणेचे अध्यक्ष विकास लिलाधर वारके यांच्या हस्ते “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या सामाजिक आयुष्यात केलेल्या भरीव कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार दवून गौरविण्यात आले आहे. श्री.दिलीपराव नाफडे यांनी शेतकरी आणि शेतकी व्यवसायाला प्रोत्साहन देत जिल्हा दूध संघाचे माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दुग्ध व्यवसाय वाढीसाठी भरीव योगदान दिले. आणि गावेगावी दुग्ध उत्पादक संस्था स्थापन करुन, त्या संस्थांचे सक्षमीकरण करुन उत्पादित दुधाला योग्य मार्केटमध्ये सुद्धा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकरी व युवकांना शेती व रोजगार विषयक कर्जपुरवठा उपलब्ध करून, समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात गावेगावी बॅंकेच्या शाखा उभारण्यास पुढाकार घेतला. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या. दिलीपराव नाफडे यांनी फक्त जिल्ह्यापुरतेच नाही तर राज्यातील इतर भागात व मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात शेतकऱ्यांचा उत्पादक कंपन्या तयार केल्या. तसेच जनसेवा शिक्षण मंडळाचे माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. विशेषतः बुलढाणा व जळगाव जिल्ह्यांमध्ये समाजातील अनेक शेतकरी व प्रवाहात सहभागी करून घेतले. जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीचे माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुध्दा केला असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी कंपन्यांना दिशा देण्याचे कार्य करीत आहे. या कार्याच्या माध्यमातून स्वतः:चे तळणी गावातील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असून नुकताच त्यांनी स्थापन केलेल्या जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुध्दा देण्यात आला आहे. त्यांच्या या उपलब्धी बद्दल परिसरातील समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.