
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंड समोर विजयासाठी 386 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली असून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भेदक गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचा सापळा न्यूझीलंडने रचला होता. परंतु भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या या योजनेला हाणून पाडले.
सामन्याच्या सुरुवातीला सलामी फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले. रोहित शर्मा 85 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. तर शुभमन गिल 78 चेंडूत 112 धावा करून बाद झाला. या दोघांनी 200 हुन अधिक धावांची भागीदारी रचली.रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली 27 चेंडूत 37 धावा करून माघारी परतला. इशान 17 धावांवर रन आऊट झाला, सूर्यकुमार यादव 14 व वॉशिंग्टन सुंदर 9 हेही माघारी परतले. 0 बाद 212 वरून भारताची अवस्था 6 बाद 313 अशी झाली. हार्दिक पांड्या व शार्दूल ठाकूर यांनी 34 चेंडूंत 54 धावांची भागीदारी केली. शार्दूल 17 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 25 धावांवर माघारी परतला. हार्दिक 38 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह 54 धावांवर बाद झाला. किवी गोलंदाज जेकब डफीने 10 षटकांत 100 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारताने 9 बाद 385 धावा केल्या.
न्यूझीलंड समोर भारताने सामना जिंकण्यासाठी 386 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. भारताने दिलेलं हे आव्हान पूर्ण करणं न्यूझीलंड संघासाठी नक्कीच सोप्प नव्हते.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडकडूनही जबरदस्त खेळ होईल अशी अपेक्षा होती, परंतु हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला माघारी पाठवले. डेव्हॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी 106 धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचा डाव रुळावर आणला. पण, कुलदीप यादवने निकोल्सला ( 42) पायचीत करून ही जोडी तोडली. कॉनने एकाकी झुंज देत राहिला आणि त्याने 71 चेंडूत शतक पूर्ण केले. कॉनवे व डॅरील मिचेल यांची 78 धावांची सेट झालेली जोडी शार्दूल ठाकूरने अनपेक्षित बाऊन्सर टाकून तोडली. मिचेलला 24 धावांवर माघारी जावे लागले. शार्दूलने पुढच्याच चेंडूवर किवी कर्णधार टॉम लॅथमला ( 0 ) माघारी पाठवून मॅच फिरवली.पुढच्याच षटकात शार्दूलने चतुराईने गोलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सला ( 5) विराट कोहलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.उम्रानच्या वेगवान चेंडूचा कॉनवेला अंदाज नाही घेता आला अन् रोहितच्या हाती त्याने झेल दिला. कॉनवे 100 चेंडूंत 12चौकार व 8 षटकारांसह 138 धावांवर माघारी परतला.मायकेल ब्रेसवेल व मिचेल सँटनर ही जोडी खेळपट्टीवर होती अन् भारतीय चाहत्यांनी पहिल्या वन डेतील त्यांच्या खेळीची धास्ती घेतली होती. पण, कुलदीप यादवने चतुराईने ही जोडी तोडली. ब्रेसवेलला 26 धावांवर इशान किशनने यष्टिचीत केले. कुलदीपने आणखी एक धक्का देताना ल्योकी फर्ग्युसनला ( 7) बाद केले. रोहितने एक हाताने मस्त झेल घेतला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 295 धावांवर माघारी परतला आणि भारताने 90 धावांनी सामना जिंकला. शार्दूल व कुलदीप यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
भारताने तिसरी वन डे जिंकून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले, शिवाय वन डे क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले.भारताने 114 रेटींग गुणांसह आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडला ( 113 ) मागे टाकले.भारताने यासह घरच्या मैदानावर सलग सातव्यांदा वनडे मालिका आपल्या नावे करत न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप केले.