
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील दिग्रस (खु) गावात रविवारी २१ रोजी लग्न समारंभातील जेवणातून जवळपास शंभर पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. लग्न समारंभातील जेवणात विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. या लग्नानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. लग्न सोहळा पार पडून २४ तासानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी दिग्रस प्राथमिक उपचार केंद्रात मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असलेल्या रुग्णात वाढ होऊ लागली हळूहळू अनेकजण प्राथमिक उपचार केंद्रात जाऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
लग्न मंडपा जवळच्या उपआरोग्य केंद्र दिग्रस येथे जाणाऱ्यांची संख्या संध्याकाळ पर्यंत वाढू लागली. जागेअभावी मंगळवारी सकाळपासूनच कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता रुग्ण दाखल होऊ लागले लग्न समारंभातील जेवणातूनच ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी लग्न समारंभ स्थळी जाऊन त्याठिकाणी सॅम्पल घेऊन तपासणी साठी पाठवले असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुर्यकांत लोणीकर यांनी सांगितले. या घटनेमागचे नेमके कारण समोर आलेले नाही.
जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या अधिपत्याखाली डॉ.अरविंद फिसके डॉ. रवी पोरे डॉ.महेश पोकले डॉ.श्रीकांत मोरे, डॉ.राठोड, डॉ.गजानन पवार, डॉ.शाहीन, डॉ.नम्रता धुने, खाजगी रुग्णालयाचे डॉ. प्रकाश सादलापुरे, डॉ. मीनाक्षी सादलापुरे, दिग्रस उपकेंद्रातील डॉ.प्रविण जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे यशवंत पदरे सिस्टर वैशाली कदम, वाघमारे, कर्मचारी दुरपडे, कागणे आदीसह उपचारासाठी परिश्रम घेत आहेत दरम्यान कुठल्याही रुग्णाची प्रकृती ही धोकादायक नसून त्यांच्यावर कंधार ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून सोडून देत असल्याचे संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, भोजुच्यावाडीचे सरपंच प्रतिनिधी सतीश देवकते माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड आदींनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.