दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पालम : येथील मोंढा भागात तोंडाला कपडा बांधून ओळखता येणार नाही अशा अवस्थेत दोन लुटारुंनी सिध्दनाथ ज्वेलर्समध्ये दांडगाई ने प्रवेश केला व बंदुकीचा धाक दाखवत सुमारे रुपये दहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना काल रात्री पालम येथे घडली असल्याने व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
पालम येथील मोंढा परिसरात मोठी ज्वेलर्स व्यापारी पेठ आहे. या परिसरात शेत-माल खरेदी- विक्रीचीही दुकाने मोठ्या संख्येने आहेत. शनिवार हा बाजाराचा दिवस असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. रात्रौ आठ वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील सिध्दनाथ ज्वेलर्स या दुकानात तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन लुटारूंनी बंदुकीचा आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत प्रथम दुकानात प्रवेश मिळवला आणि तेथे असलेले मालक व मुनिमास दरडावून तसेच जीवे ठार मारु असे धमकावत सुमारे दहा लाख रुपये किंमतीची सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करुन पोबारा केला.
नेकलेस, झुंबर, मनी-मंगळसूत्र, गंठण यांच्यासह अन्य सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज बॅगेत भरुन लंपास केला. धारदार शस्त्र व बंदुकीचा धाक दाखविल्यामुळे जीवाला घाबरुन मालक आणि मुनीम या दोघांनीही आवाज काढला नाही तथापि दुकानात मालक व मुनीमाबरोबर होत असलेली झटापट मार्केटमधील अन्य लोकांच्या नजरेस पडली होती. त्यामुळे काहीं नी दुकानात घुसून दुकान मालकाला मदत म्हणून लुटारुंना पकडण्याचा प्रयत्न सुध्दा केला. परन्तु त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्या लुटारूंनी पळून जाण्यात यश मिळविले.
सदर घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, एपीआय मारुती कारवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानातील वास्तव स्थितीची पाणी केली. यानंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असली तरी परिघातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. एकूणच काय तर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक दुकानदारांनी यापुढे पोलिसांवरच निर्भर न राहाता समन्वयातून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आता अत्यंत गरजेचे असल्याचे ठरले जाणे स्वाभाविक आहे.