दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समतेचे राज्य घडवणारे न्यायप्रिय बहुजन प्रतिपालक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती, नरसिंह प्रतिष्ठान नरसिंहनगर (टेंभुर्णी) यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंना वंदन करून करण्यात आली.
शिवजयंती निमित्त नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते यामध्ये मोफत नेत्र तपासणी, सार्वजनिक खुले वाचनालय, ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करण्यात आले. शिवशाहीर विशाल इंदलकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर करण्यात आला. याबरोबरच मर्दानी खेळ करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक ठरले ते छत्रपती शिवाजी महाराज यांची निघालेली मिरवणूक आणि या मिरवणुकीमध्ये ढोल ताशे आणि पारंपारिक वाद्य सर्वांचे मन आकर्षित करून घेत होते. या सोहळ्यामध्ये नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, युवक वर्ग, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी तथा महिला, बालक तथा शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.