
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
महाराष्ट्राच्या पावन भूमीत जन्मास आलेले व आधुनिक भारताला ज्यांचा गर्व आणि सार्थ अभिमान असला पाहिजे असे महान, सतपुरुष या पावभूमीत जन्मास आले त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत गजानन महाराज, संत स्वामी समर्थ, साई बाबा, संत अवजीनाथ महाराज, संत सद्गुरु वामनभाऊ महाराज, राष्ट्र संत भगवानबाबा असे संत महापुरुष, सिद्धपुरुष, होऊन गेले. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 19 व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या पावनभूमीत संत परंपरेतील संत गाडगे महाराज यांचा जन्म शेंदगांव ता.अमरावती येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे संपुर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते पुढे लोक त्यांना संत गाडगेबाबा महाराज असे म्हणवू लागले. पुढे चालून सामाजिक परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण पाहून आणि लोकांची दैनंदिन जीवनातील हालाखीची परिस्थिती पाहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी संत गाडगेबाबा महाराज यांनी आपले संबंध जीवन समर्पित केले. किर्तनकार, समाजसुधारक, समाजप्रबोधनकार, अशा विविध माध्यमातून संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश संबंध जगाला दिला.
महाराष्ट्राच्या काही भागात इंगजांची राजवट तर काही भागात हैद्राबाद स्थित निजामाची राजसत्ता या कठीण परिस्थितीत रयत मात्र होरपळून निघालेली होती अशावेळी अनाथ लोकांसाठी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम, विद्यालय सुरु केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ठ रुढी परंपरा दुर करण्यासाठी त्यांनी आपले संबंध जीवन वेचले. भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, निर्वस्त्रांना वस्त्र द्या, गरीबांसाठी शिक्षणाला मदत करा, अहिंसेला महत्व द्या तसेच स्वच्छता हा गाडगेबाबांचा मुळ संदेश. तत्कालीन परिस्थितीत दळण-वळणाच्या कुठल्याही सुविधा नसतांना संत गाडगे महाराज यांनी महाराष्ट्रातून अनेक गावांमध्ये त्यांनी पायी प्रवास करुन स्वतः हातामध्ये झाडू व खराटा घेवून अनेक गावे स्वच्छ केली आणि सगळ्यात महत्वाचे स्वच्छता ही मानवी मनापासून असते आणि मानवी मन स्वच्छ झाले पाहिजे म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी विचारांची पेरणी केली आणि दरम्यानच्या काळात संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्यातून प्रेरणा घेवून अनेक गावे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून , स्वच्छतेचे महत्व जाणून स्वच्छ झाली. संत गाडगेबाबा महाराज यांचे स्वच्छता अभियानाचे कार्य आणि प्रबोधनाचे कार्य इतके उच्च पराकोटीचे होते की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा संत गाडगेबाबा यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.
संपूर्ण मानवी जीवनाला स्वच्छतेचा संदेश देणार्या संत गाडगे बाबा यांचे वैकुंठगमन 20 डिसेंबर 1956 रोजी झाले. त्यांच्या कार्याची महती एवढी महान होती की, पुढे चालून महाराष्ट्र शासनाने सुद्धा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना संत गाडगेबाबा यांच्या नावाने चालू करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला व स्वच्छता अभियानात आदर्श कार्य करणार्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार सुरु केला.
संत गाडगेबाबा यांचे 18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक जिवनात बदल घडवण्यासाठी अनमोल योगदान आहे अशा महान राष्ट्रसंतास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ, महाराष्ट्र
वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबिर, अध्यात्मिक मार्गदर्शक
मो.9011634301