दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कौठा – आई हेच खरे दैवत असल्याचे सर्वधर्म संस्थापकांनी, साहित्यिकांनी, संतांनी परोपरीने सांगितले आहे. हे मातृत्व सर्वच योनित आपणास पाहावयास मिळते. जी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जिवापाड प्रेम करते ती आई. खरा देव इतरत्र शोधण्याची गरज नाही तर तो आई-वडिलांच्या सेवेतच आहे. जगातील अनेक महापुरुषांना घडविण्यात आईचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. माझ्यावरही माझ्या आईने संस्कार केले म्हणून मला आयुष्यात काही करता आले. आज त्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जात आहे.श्रावणबाळ योजना सारख्या योजना यायला लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी आई-वडिलांची वाटणी करून घेतली जाते. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,विवेकानंद या व यासारख्या कितीतरी महापुरुषांना आईने घडविले. छत्रपती शिवरायांना कार्य कर्तृत्व करताना सर्वाधिक मदत आई जिजाऊंची झाली. अनेक कष्ट सहन करून आई आपल्या बाळाला घडवत व वाढवत असते. तिची मात्र म्हातारपणात उपेक्षा होताना दिसत आहे. तिला आपले लेकरु प्राणापेक्षाही जास्त आवडते. अशा आई-वडिलांना आपण विसरता कामा नये. लिंगैक्य भिवराबाई यांनी व गणेशराव देशमुख यांनी आपल्या मुलांना घडविण्यात अनेक कष्ट घेतले तसेच आईच्या जाण्यानंतरही मुलांनी व पतीने प्रथम पुण्यस्मरण दिन आज विविध उपक्रमांनी साजरा केलाय. हा खरोखरच सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे. आई नावाच्या परिसराला जपा असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा आईकार प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांनी मौजे कौठा ता.कंधार येथे दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी लिंकैक्य भिवराबाई यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आई वडील या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मताधिपती श्रद्धेय डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज होते. त्यांनी यावेळी आशीर्वाचन देताना सांगितले की आई-वडिलांना विसरू नका. देव त्यांच्यातच आपणास पाहायला मिळतो. गुरुमाऊली हे देखील एक देव मानले गेले आहेत. गणेशराव व त्यांचा परिवारा हा अध्यात्मिक आहे. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी गेल्यावरही एवढा सामाजिक उपक्रम घेऊन पुण्यस्मरण दिन साजरा केला. गुरुमाऊली या नात्याने आमचे सतत त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद राहतील. आपणही असे उपक्रम घेऊन पुण्यस्मण साजरे केले पाहिजे. तसेच यावेळी धानोरा येथील चिंतनगीरी महाराज मुखेडचे विरभद्र स्वामी या महाराजांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजीराव देशमुख गुरूजींनी केले तर आभार गणेश हात्ते यांनी मानले.
कार्यक्रमास यावेळी गणेशराव देशमुख यांच्या शिवपाठ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सर्व उपस्थितांना शिवपाठ व रुद्राक्षाच्या माळा व शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेना नेते बाळासाहेब क-हाळे धन्वतरी क्लिनीकच्या संचालिका डॉ. स्वप्नजा चांडोळकर आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे शंकरराव देशमुख प्रताप देशमुख ओमप्रकाश देशमुख भिमाशंकर देशमुख सिद्धेश्वर देशमुख उपसरपंच गंगाधर हात्ते संभाजीराव देशमुख सूर्यकांतराव देशमुख सह आदीं उपस्थित होते.