दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील रहिवासी तथा एकल महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षा माधवी उत्तमराव बनसोडे यांची अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्त्या आशाताई पांडे, उस्मानाबाद येथील महानंदाताई चव्हाण, मुरूड जि.लातूर येथील सतिष जाधव, मा.सचिव गंगासागर सोनकांबळे व विद्याताई डोरनाळीकर व तसेच तालुक्यातील सुमारे २५ गावातील अध्यक्षा, सचिव व गावप्रमुख, शहरातील अध्यक्षा, सचिव व शहरप्रमुख यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत एकल महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
सबंध राज्यामध्ये कार्यरत असलेली एकल महिला संघटना महाराष्ट्र. या संघटनेच्या मुखेड तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्त्या गंगासागर सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा, परितक्ता, घटस्फोटित व नैसर्गिक अथवा शारीरिक व्यंगत्वामुळे अविवाहित अशा सर्व एकल महिलांचे संघटन करून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकास व्हावा या दृष्टिकोनातून संघटनेचे कार्य हे अतिशय जोमाने चालू असून या संंघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी माधवी उत्तमराव बनसोडे यांच्या अंगी असलेली प्रेमळवृत्ती, संघटन कौशल्य, व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची एकल महिला संघटनेच्या मुखेड तालुकाध्यक्ष या पदावर सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली तसेच त्यांच्यासोबतच सचिवपदी मस्तानबी इसाक शेख, कोषाध्यक्षपदी सखुबाई मारोती वाघमारे तर सदस्यपदी सोनाली माधव डुबुकवाड, बायनाबाई मरिबा धनवाडे, गंगामनी रामदास येरकलवाड व रिहाना इमाम शेख यांचीही यावेळी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल माधवी बनसोडे यांच्यासह निवड झालेल्या सर्व पदाधिका-यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.