दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
मेहसाणा : विविधतेने नटलेल्या भारत देशात लग्न समारंभाच्या पद्धती सुध्दा नानाविध आहेत. अशाच एका लग्नाची थरारक कथा सध्या सोशल मिडिया वर व्हायरल झाली आहे. ती बघून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल.
आपण कित्येक लग्नात जात असतो. लग्न व अन्य सर्व विधी उरकल्यानंतर जेव्हा वरात लग्नाच्या ठिकाणाहून वराच्या घरी निघते तेव्हा दरम्यानच्या रस्त्यात नवरदेव-नवरीच्या अंगावर कोणी कोणी रुपये पाच, दहा, वीस, कोणी ५०, फार फार तर १०० च्या नोटा ओवाळून टाकतात. परंतु सोशल मिडियावर ज्या लग्नाची चर्चा होते आहे, त्या लग्नाची वरात जेव्हा घरी येते तेव्हा मात्र त्याच घराच्या गच्चीवरुन, गॅलेरीतून नवरदेवाच्या घरातील लोकांनी लाखोंच्या नोटांची उधळण केल्याचे समोर आले आहे. त्या वास्तव प्रसंगाचे व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाले आहेत. गुजरात मधील केकरी तालुक्यातील सेवडा अगोल नावाचे गाव असून तेथील हा प्रकार आहे. त्या गावातील माजी सरपंच असलेल्या एका व्यक्तीच्या भाच्याचे ते लग्न होते.
नवरदेव-नवरीची वरात ‘वर’ राहात असलेल्या इमारती खाली आली असता सरपंचांच्या घरातील लोकांनी इमारतीच्या गच्चीवरुन, बाल्कनीतून अचानक रुपये दहा व पाचशेच्या नोटांची लाखोंच्या संख्येने उधळण होतांना दिसून आले. वरातीमध्ये सामील शेकडो लोकांनी पण उधळण होणाऱ्या त्या नोटा गोळा करण्यासाठी एकच धांदल, नव्हे तर गदारोळ उडाल्याचे दिसत होते. नोटा उधळण्याच्या या पध्दतीला सोशल मिडियावर मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याचे आढळून आले.
गुजरातमध्ये अशा नोटा उधळण्याची पद्धत फार जुनी आहे. मग ते शुभ कार्यक्रम असोत किंवा ते गाण्यांचे असोत, अशा कित्येक कार्यक्रमांमधून या प्रकारे भयंकर नोटा उधळल्या जातात. नव्हे ही परंपरा पूर्वापार चालत आलेली असल्याचे म्हटले जाते. उधळण केले जाणाऱ्या नोटांचे फोटो सुध्दा त्या त्या वेळी काढून नंतर ते सोशल मिडियावर व्हायरल करण्यात त्यांना मनस्वी आनंदच वाटत असतो. अशीच प्रथा राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि लगतच्या राज्यांमध्येही पूर्वापार चालत असल्याचे बोलले जाते. काही राज्यांतून तर बंदूकीचे बार मोठ्या प्रमाणात उडवले जातात. ती पध्दत आता बदलली जात असून विद्यमान काळात तर पिस्टलच्या काडतुसांचे आवाज हवेत उडवून मोठा धमाका केला जातो. हे सर्वश्रुत असल्याचे बोलले जाते.