
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘ पांडू ‘या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यानंतर, आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहेगेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पांडू’ या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम मुख्य भूमिकेत झळकणार असून त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
विजू माने दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटात भाऊ कदमसोबतच कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी झळकणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या चित्रपटाच्या कथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘पांडू’ या चित्रपटात दोन मित्रांची कथा उलगडली जाणार आहे. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तेही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते, असं प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी हे दिग्गज कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट पूर्णतः विनोदीपट आहे.