
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:प्रत्येकाने जीवन जगत असताना डोकं रिकामं न ठेवता डोक्यावर माय-बापाला ठेवा, त्यांची सेवा हीच खरी भगवंताची सेवा असून त्यासारखे दुसरे पुण्य जगात नाही. तरुण पिढीने आपल्या माय-बापाच्या हृदयाला आघात होणार नाही असे वर्तणूक करावे असे आवाहन ह.भ.प.मामासाहेब महाराज काजळे (नरसिंहपूर) यांनी निमगाव केतकी येथे २३ फेब्रुवारी रोजी कै.तुळसाबाई(नानी) मारुती भोंग यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित किर्तन सेवेतून केले.
आजच्या काळात माणसाला समाधानाची गरज आहे.हे सर्व समजत असूनही लोकांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन होणे अपेक्षित आहे. कितीही विपरीत परिस्थिती आली तरी आपल्या उच्च विचाराने परिस्थितीशी सामना करता आला पाहिजे. आपल्या मुलांवर संस्कार करताना ते त्यांच्यावर ओरडून ,त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात. तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत, तरच ते मुलांच्या खोलवर रुजले जातात. आपल्या आजीने (नानी) घालून दिलेला आदर्श विचार, संस्कार घेऊन आज नानींची नातवंडे सामाजिक जाणीव ठेवून समाजात कार्यरत आहेत.
कै. तुळसाबाई (नानी) भोंग ह्या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.त्यांचे सर्व कुटुंब माळकरी आहे.त्यांनी पंढरीची वारी आयुष्यात कधीही चुकून दिली नाही. त्या अतिशय मनमिळावू व प्रेमळ स्वभावाच्या होत्या कोणाचेही मन दुखावेल असे त्या कधीच वागल्या नाहीत. म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांच्यावरती प्रेम करणारा अलोट जनसागर उपस्थित होता. यातूनच नानींचे सर्वांशी असणारे मनमिळावू नाते दिसून येत होते.