दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
वझरगा ता.देगलूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज राष्ट्रसंत, थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आयुष्यभर शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गाडगे महाराज, दिवसा गावं झाडून स्वच्छ करत तर रात्री आपल्या किर्तनातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान यावर प्रहार करणारे थोर समाजसुधारक अर्थात संत होत. संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा येथील मुलांनी शाळेची व परिसराची स्वच्छता केली. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वच्छता अभियानात मनापासून सहभाग नोंदवला. काही विद्यार्थी श्री संत गाडगेबाबा यांची वेशभूषा धारण करून आल्याने शाळेत मोठ्या उत्साहाचे वातावरण तयार झाले. बालसंत व त्यांच्याकडून गाडगेबाबा सम घडणारी स्वच्छतेची कृती गावकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी सौ. देवकते मॅडम, सौ. कांबळे मॅडम, सौ. मिरगाळे मॅडम व आधी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.