
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील मौजे करडखेड येथे बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या मुंबई – कल्याण या अवैध मटका जुगार अड्ड्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रसन्नजीत दावणगीरकर यांनी देत पोलिस उपाधीक्षकांचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे करडखेड येथील बसस्थानक परिसरात उघड्यावर मटका व जुगार खेळविला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद हायस्कूललगत केवळ दहा फूट अंतरावर असलेल्या दुकानात व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मटक्याचे होर्डिंग व आकडे असलेले बॅनर चिकटवून सर्रासपणे मुंबई व कल्याण नावाचा जुगार जोमात सुरू आहे. या ठिकाणी जवळपास दहा मटका एजंट सक्रिय असून, या लोकांच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. या अड्ड्याच्या शेजारीच बसस्थानक व शाळा असल्याने या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अनुचित प्रकाराचा विद्यार्थ्यांसह प्रवासी महिला व मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील गोरगरीब व कष्टकरी जनता या मटका व जुगाराच्या नादी लागून आपल्या संसाराची राख रांगोळी करत आपले आयुष्य उद्धवस्त करून घेत आहेत. दखल न घेतल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी दिला आहे.