दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मागच्या एक दिड वर्षांपासून अवैध धंदे करणाऱ्यांना सळो कि पळो करुन सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र त्यांची बदली होताच त्यांना वाजतगाजत निरोप दिल्यानंतर नायगाव शहरात धुमधडाक्यात मटका सुरु झाला असून.
भुमिगत झालेले मटका माफीया पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मटका सुरु करण्यासाठी स्थानिक बिट जमादाराने पुढाकार घेतला असला तरी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे हे कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.बिलोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एक वर्षापूर्वी पदभार घेतला. सुरुवातीपासूनच त्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ठाणेदारांनी या अवैध धंद्याला संरक्षण देण्यास नकार दिला होता. तर चांडक यांनी बिलोली तालुक्यातील एका रेती घाटावर धाडसी कारवाई करुन संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते.
तेव्हापासून त्यांचा बिलोली उपविभागात मोठा दबदबा निर्माण झाला होता. आणि अवैध धंदे करणाऱ्यांनीही त्यांची धसकी घेतली होती. जिथे जिथे चोरट्या मार्गाने अवैध धंदे चालू होते तेथे तेथे कारवाया करत अवैध धंदे करणाऱ्यांचे अर्थिक कंबरडे मोडले होते.
नायगाव तालुक्यात सर्वात जास्त अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी स्थानिक बिट जमादार व एक पोलीस कर्मचारी बराच पुढाकार घेतला होता. चांडक कितीही कारवाया करत असल्या तरी छुप्या पध्दतीने अवैध धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहन देत होते. त्याचबरोबर एक दोन वेळा अवैध धंद्यावर होणारी कारवाई अपयशी ठरण्यासाठी यांनीच पुढाकार घेतला होता अशी आजही नायगाव पोलीस ठाण्यात चर्चा होते.ज्यावेळी चांडक यांच्या बदलीचे आदेश आले याच दोन पोलिसांनी आनंद तर व्यक्त केलाच पण एकदाची ब्याद गेली म्हणून वाजत गाजत निरोपही दिला आहे. त्यानंतर नायगावचे अति कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचीही धर्माबादला बदली झाली.
उपविभागीय कार्यालय बिलोलीला असले तरी चांडक यांचा मुक्काम नायगावला असल्याने नायगावच्या ठाणेदारांना मोठी अडचण होत होती. चांडक हे बदली होवून नागपूरला गेले शिंदे हे धर्माबादला जाताच नायगावसह तालुक्यात मटका, गुटखा व जुगार अड्डे धुमधडाक्यात सुरु झाली आहेत. आता आम्हाला कुणीच आडवणारे नाही या अविर्भावात अवैध धंदे करणारे वावरत आहेत. सध्या नायगावसह बिलोली उपविभागाचा पदभार धर्माबाद उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे पदभार आहे पण त्याच्याकडून कारवाई करण्यात अपयश येत आहे.