दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे मालेवाडी येथे दरलींगेश्वर संस्थानात सप्ताहाच्या कार्यक्रमा निमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पांडुरंग महाराज सदगे राहणार हटकरवाडी तालुका मानवत जिल्हा परभणी येथील रहिवासी पिढ्यानपिढ्यापासून सदगे कुटुंब हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे वारी करतात. वारकरी संप्रदायात त्यांना जिल्हाभर ओळखले जाते.
मृदंग वादक असलेल्या त्यांच्या मुलाची
किडनी खराब झाल्याचे आढळून आले. पांडुरंग महाराजांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी घर, शेती विकून टाकली. आजपर्यंत जमवलेली सर्व पुंजी उपचारासाठी खर्च केली.
स्वतःची किडनीही दिली. पण ती फेल झाल्यामुळे परत एकदा त्या मुलाचे किडनी प्रत्यारोपण करायचे असून त्यासाठी दहा लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हरिभक्त परायण रोहिदास महाराज मस्के यांचे रविवारी मालेवाडी येथील दरलिंगेश्वर संस्थानात सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न झाली. कीर्तनात म्हस्के महाराजांनी पांडुरंग महाराज सदगे यांच्या मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
मस्के महाराजांच्या आवाहनास उपस्थित भाविक भक्तांनी दाद देत मोठ्या प्रमाणात मदत केली. यामध्ये एकूण 26 हजाराची मदत हजारो भक्तांच्या उपस्थितीत पांडुरंग महाराज सदगे यांच्याकडे देण्यात आली.
सदगे परिवारासह आज पर्यंत पाच ते सहा वारकऱ्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे पैसे मिळवून देण्यासाठी धावून आल्याबद्दल रोहिदास महाराज मस्के यांचे किर्तन स्थळी उपस्थित असलेले आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हाउपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जाहीर आभार मानले. यावेळी हरिभक्त परायण अनंत महाराज बर्वे, बालासाहेब बचाटे, नारायण महाराज मालेवाडीकर, राम महाराज कुकडे, महारुद्र महाराज बोबडे, परमेश्वर मुठाळ, भानुदास शिंदे, ओंकार महाराज बोबडे पडेगावकर यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.