दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : स्व.आ. रामरावजी झनक व गोपालेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय महागाव ता. रिसोड चे प्राचार्य तथा विदर्भ मुख्याध्यापक संघाचे विदर्भ प्रतिनिधी डिगांबर मवाळ हे नियत वयोमानानुसार दि.२८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले असून त्या अनुषंगाने ग्राम पंचायत महागाव व संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागावचे सरपंच संतोष मवाळ होते तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद नरवाडे, शिक्षक बाजड, सरकटे आदींची उपस्थिती होती.
सत्कार व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा. विनोद नरवाडे म्हणाले, संयमी, कर्तृत्ववान व नेतृत्ववान असणारे आदर्श व्यक्तिमत्व हाडामासाचे शिक्षक प्राचार्य डिगांबर मवाळ सरांनी आपल्या प्रदीर्घ ज्ञानदानाच्या सेवेतून अनेक विद्यार्थी घडविले. एव्हढेच नव्हे तर, संघटनेच्या माध्यमातून मवाळ सरांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, अन्याया विरुद्ध लढतांना आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी केवळ जिल्ह्यालाच नव्हे, तर विदर्भाला बळकटी देण्यासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. ते आमच्या संघटनेचे ऊर्जास्त्रोत आहेत या पुढे देखील त्यांचं आम्हला सदैव मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो
या प्रसंगी महागावचे सरपंच संतोष मवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना , शाळा हे ज्ञानाचे मंदीर असून शिक्षक या पवित्र मंदीराचे पुजारी असतात. आमच्या गावातील स्व.आ. रामरावजी झनक व गोपालेश्वर विद्यालय संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श विद्यालय म्हणून नावलौकिकास आणण्यात प्रा. डिगांबर सर यांचं सिंहाचा वाटा आहे त्यांनी आपल्या सेवेत सर्वधर्मसमभाव, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रभक्ती, स्वच्छता, आदरभाव, एकता आणि बंधुत्व आदी अनेक नितीमुल्यांचे
संस्कार विद्यार्थ्यांवर घडविले असून, गावातील सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राहण्यासाठी आणि ग्रामविकासा साठी सदैव मार्गदर्शन केले व या पुढे देखील आम्हाला त्यांचे मार्गदर्शन राहणार आहे. सेवानिवृत्ती नंतरचे त्यांचे आयुष्य निरोगी व सुख समाधानात जावो अशी गोपालेश्वर चरणी प्रार्थना केली.
सदर कार्यक्रमास स्व.आ. रामरावजी झनक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग अण्णा काळे यांना सामूहिक आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप झाला.