
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
ज्ञानाच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते.पण त्यासाठी आपण सातत्य ठेऊन परिश्रम घेऊन जिद्दीने प्रयत्न केल्यास चिंतन,मनन,वाचन, यातुन यश सहज प्राप्त होते.म्हणुन विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक बालाजी पेटेकर खतगावकर यांनी केले.ते
शांती निकेतन माध्यमिक विद्यालय रुई (बु ) येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.प्रारंभी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व कै.गंगाधरराव देशमुख कुंटुंरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतांनी झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जी.के. बन्नाळीकर सर होते. कार्यक्रमाचे वक्ते प्रसिध्द कवी, साहित्यिक ,ग्रामीण कथाकार बालाजी पेटेकर सर होते. व्यासपीठावर वाय.डी. डुमणे सर, बाबासाहेब देशमुख सर, हिवराळे सर, वानखेडे सर, नितेवड सर, नारे सर,शरद कदम सर, पतंगे मॅडम,देवघरे मॅडम,बालाजी जंगीलवाड,शामराव मामा, याप्रसंगी उपस्थित होते.यावेळी बालाजी पेटेकर सर यांनी पट पडताळणी, शेतकरी राजा ऐक सांगतो तुझी कहाणी रं, या टीव्ही मोबाईल मुळं आणि अतिशय उत्कृष्ट ग्रामीण कथा काजळमया सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकले,नव्हे तर पोट धरून हसायला लावले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. निरोप घेत असताना त्यांचे डोळे मृग नक्षत्राच्या ढगाप्रमाणे भरून आले होते. दहावीचे वर्गशिक्षक डुमणे सर यांनी त्यांना वर्षभर आलेले अनुभव कथन केले.आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक बन्नाळीकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन कवी व्यंकट अनेराये सर यांनी केले तर आभार हिवराळे सर यांनी आभार मानले .