
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी – विजयकुमार चिंतावार :- आपल्या जिल्ह्यातील एकही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही यासाठी प्रशासनाने सदोदित काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथे दिनांक १ मार्च २०२३ रोजी महा स्वराज्य अभियान-२०२३ अंतर्गत प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे, तहसीलदार राजेश लांडगे,गटविकास अधिकारी अमित राठोड, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गिते, गटशिक्षणाधिकारी एम.जी. वाघमारे आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक मानवाच्या जीवनात संकटे ही येतच असतात आलेल्या संकटांचा समर्थपणे सामना करणे हे आपले कर्तव्य असते. तसेच कोणत्याही समस्या उद्धभवल्यास शेतकऱ्यानी वैफल्यग्रस्त न होता त्यातून कसा मार्ग काढता येईल ते पाहावे प्रशासन हे आपल्या मदतीसाठी सदैव आपल्या पाठीशीच उभे आहे. ग्रामस्थांनीही वैफल्यग्रस्त झालेल्या कुटुंबांना चार शब्द आपुलकीचे बोलून त्यांना धीर देणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. तसेच प्रत्येकाने आपाआपल्या पद्धतीने आपले गाव स्वच्छ ठेवावे जेणेकरून रोगराईचा प्रवेश गावात होणार नाही तसेच शाळा विकसित करण्यावर भर द्यावा कारण त्यातच गावातील पुढचे भविष्य दडलेले आहे. म्हणून गावाचे वर्तमान व भविष्य सर्वांनी जपावे असा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तालुक्यातील २१ रास्त भाव दुकाने आय.एस.ओ. मानांकित श्रेणी मिळविल्यामुळे सर्व दुकानदारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील विविध १५ कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या लोकोउपयोगी उपक्रमाचा शुभारंभ करून गरजूंना विविध प्रमाणपत्राचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रामुख्याने महसूल विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग, वर्ल्ड व्हिजन संस्था,एकात्मिक बाल विकास विभाग,विद्युत विभाग,भूमी अभिलेख विभाग आदी विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राजेश लांडगे यांनी करून तालुक्यातील सर्व विभागाचे कर्मचारी आपापल्या कार्यात कर्तव्य दक्ष असून सर्वांच्या अडीअडचणी सहानुभूती पूर्वक सोडवल्या जातात असे सांगितले.नागरिकांना हवे ते सहकार्य केल्या जाते अशी ग्वाही देऊन जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व प्रशासन दक्ष आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पत्रकार बालाजी नार्लेवाड यांनी केले तर आभार दंडे यांनी मांनले. या कार्यक्रमास सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव अमृतवाड, शिवाजी पाटील किन्हाळकर,मुदखेडचे नायब तसिलदार संजय नागमवाड,नायब तहसीलदार संजय सोळंकर, नायब तहसीलदार पुरवठा रेखा चामनर, भोकर चे तलाठी महेश जोशी, पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी वर्ग,विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, पत्रकार मंडळी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.