
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्यात निरनिराळ्या शाळा, महाविद्यालय, मुलींचे वसतिगृह आणि आदिवासी शाळांमधील मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार त्याशिवाय त्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस होणारी अधिकच वाढ, त्या ठिकाणी आवश्यक असणारी स्वच्छता, सुरक्षा, राहाणे व भोजनाची व्यवस्थेची पहाणी करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या परभणी जिल्ह्यात दौरा करणार असल्याचे समजते.
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात त्या जालना जिल्ह्यातील जनसुनावणी व आढावा बैठक आटोपून गुरुवार दि.२ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी येणार आहेत.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दि.३ मार्चला सकाळी ११ वाजता परभणी जिल्ह्यातही विविध प्रकरणांवर जनसुनावणी घेणार आहेत. त्यानंतर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येऊन त्यात त्या काही महत्वाकांक्षी धोरणही जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारी २.३० वाजता जिल्ह्यातील घडामोडींवर व काही धोरणात्मक बाबींवर आधारित एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
सौ. चाकणकर या सदर पत्रकार परिषदेनंतर मात्र विविध शाळा, महाविद्यालये, भरोसा सेल, वनस्टॉप सेंटर, मुलींचे वसतिगृह आणि दामिनी पथक आदी ठिकाणी भेटी देऊन त्या तेथील व्यवस्थापन, राहाणे व भोजन व्यवस्थेबरोबरच ऐरणीवर असलेल्या सुरक्षेबाबतही निरिक्षण करुन त्याविषयी घेणे आवश्यक असलेली जबाबदारी बाबतचे निर्देश देतील असे समजते. एकूणच असे जर झाले तर मात्र बऱ्याचशा संस्थांना काळजी घ्यावी लागेल असे दबक्या आवाजात नागरिक बोलतांना आढळून आल्याचे समजते. त्याचाच परिपाक म्हणून अशा संस्थांवर सौ. चाकणकर यांची करडी नजर राहिली जाईल असे म्हटले तर चुकीचे ठरु नये.