
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील काही महिन्यांपासून विविध मार्गांनी गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय आणि मिश्र स्वरुपाचे ग्राहक कमालीचे संतापले आहेत. त्यांच्या त्या संतापाचा उद्रेक होऊन कधीही भडका उडाला जाऊ शकतो. अशा भयाण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असतांनाच आज पुन्हा केंद्र शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर दरांमध्ये वाढ करुन एका पाठोपाठ एक अशा महागाईचा भडका उडवून दिला आहे. परिणामी संतापलेल्या ग्राहकांमध्ये त्याचा कधीही भडका उडाला जाऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका बाजूला पेट्रोल-डिझेलरुपी इंधनाचे दर वाढवून मध्यमवर्गीय मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे कर्जावरील व्याज दरांत मोठी वाढ करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वच ग्राहकांना डबघाईला आणले आहे तर पाठोपाठ आज केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करुन सर्वसामान्यांसह व्यावसायिकांचीही पूरती दाणादाण उडवून दिली आहे. परिणामी सर्वच स्तरांतील मतदार नागरिक गगनाला भिडणाऱ्या या महागाईमुळे आता मात्र पूरता त्रस्त झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या राज्य व केंद्रातील सरकारांच्या विरोधात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
घरगुती गॅस सिलिंडर दरामध्ये रुपये ५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडर दरामध्ये रुपये ३५० एवढी वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ करुन ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. कॉंग्रेस राजवटीत रुपये ७०० एवढे दर प्रचलित असूनही रान उठवणारी भाजपा व त्यांचे नेते मंडळी आज मात्र १२०० पेक्षा अधिक दर होऊनही तोंडाला पट्ट्या लावून आळी मिळती, चूप गिळी जणू याच प्रवृत्तीने वागत आहेत. तेल कंपन्यांनी केलेल्या दरवाढीचा बाऊ करीत भाजपाने मात्र त्यावर कोणतेही नियंत्रणाचे मार्ग न शोधता उलटपक्षी त्या दरवाढीचेच समर्थन करीत ग्राहकांना मात्र पूरते नागवले जात आहे. नुकताच झालेल्या पाच राज्यांतील निवडणूकांचा बार उडवून दिल्यामुळे मतदार नागरिकांची आता कोणतीही गरज नसल्याचेच या दरवाढीने दाखवून दिले आहे.
अगोदरपासूनच सुरु असलेली इंधन दरवाढ सहन करणाऱ्या ग्राहकांना केंद्राच्याच अखत्यारीतील रिझर्व्ह बॅंकेने कर्जावरील व्याज दरांत मोठी वाढ करुन जो कमालीचा झटका दिला आहे, तो असह्य असाच म्हणावा लागेल. त्या वाढीव खर्चाच्या मेटाकुटीतून सावरतोय न सावरतोय तोच घरगुती गॅस सिलिंडर दरात ५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात ३५० रुपयांची अचानक वाढ करुन निवडणूका कालावधीत असलेली गरज संपल्याचेच दाखवून दिले आहे. परिणामी एकापाठोपाठ एक अशा गगनाला भिडणाऱ्या महागाईचे डोंगर समस्त मतदार ग्राहकांना खाईत लोटून त्यांचा कडेलोट करणारेच ठरले जाणारे असल्याने केंद्र सरकार विरोधात संतापलेल्या या ग्राहकांचा उद्रेक कोणत्याही क्षणी कमालीचा भडका उडवून दिल्याशिवाय राहणार नाही, असेच सर्वत्र बोलले जात आहे.