
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
नवि दिल्ली : मस्क यांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर उसळी घेतली आहे.
गेल्या वर्षी मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचं यादीतील पहिल्या क्रमांकावरील स्थान घसरून ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. पण यावर्षी एलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मस्क यांनी लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्ट यांना मागे टाकलं आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये फ्रान्सचे अब्जाधीश आणि लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रँड लुई व्हिटॉनचे मालक बर्नार्ड ॲरनॉल्टने यांनी मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला होता.
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीत ‘नंबर वन’ ठरले असले तरी, फोर्ब्स यादीत मस्क दुसऱ्या स्थानावर आणि बर्नार्ड ॲरनॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत.
गेल्या वर्षी मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचली होती. पण मस्क पुन्हा एकदा अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेर्स रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एकूण 187 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बर्नार्ड ॲरनॉल्ट यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे.
या वर्षी मस्क यांच्या एकूण संपत्ती वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याआधी त्यांच्या संपत्ती 50.1 अब्ज डॉलरची वाढ झाली होती.
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मस्क यांना 180 अब्ज डॉलरचं नुकसान झालं होतं. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली.