दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यानंतर रग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपली पहिली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई येथे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र,आता देशपांडे यांनीही उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हल्ल्यामागील मास्टरमाईंडला सूचक इशारा दिला आहे.
देशपांडे म्हणाले, हे असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे. असंही देशपांडे म्हणाले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अमेय खोपकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जात देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.