दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
पुणेः- गुंजेचा पाला, आक्रित, एका सत्याचा प्रवास यासारख्या असंख्य लोकप्रिय कथासंग्रहाचे लेखक व प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांच्या ‘आक्रित’ या कथासंग्रहातील “मुक्ता” या कथेवर आधारित एकांकिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याबाबत आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे .
“मुक्ता” या एकांकिकेचे लेखक बबन पोतदार हे निवृत्त आयकर अधिकारी असले तरी ते जनमानसात प्रामुख्याने ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक म्हणून सर्व परिचित आहेत. ब.ल.पोतदार तसेच बबन पोतदार या नावाने त्यांची सर्वत्र ओळख आहे.त्यांनी आजवर विविध वृत्तपत्रामध्ये स्तंभलेखन केले असून आकाशवाणी पुणे, मुंबई, सांगली केंद्रावर त्यांच्या अनेक कौटुंबिक श्रुतिका प्रसारित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुनही त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य व कथासंग्रह मोठया प्रमाणात आहे. त्यामध्ये गुंजेचा पाला, आक्रित, एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह वाचकांच्या प्रचंड आवडीचे ठरले आहेत. त्यांच्या ‘आक्रित’ या कथासंग्रहातील “मुक्ता” या कथेवर आधारित यापूर्वी “गुंतले ह्रदय माझे” या मराठी चित्रपटाची निर्मित झाली होती.त्यालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
पुणे येथील नुप्रिहा क्रिएशन्स या ख्यातनाम नाट्य संस्थेतर्फे बबन पोतदार यांच्या गाजलेल्या ‘आक्रित’ या कथासंग्रहातील “मुक्ता” या कथानकावरवर आधारित ‘मुक्ता ‘ ही एकांकिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कथेचे नाट्य रुपांतर धनंजय खाडिलकर व अनघा गपचूप यांनी केले आहे. दिग्दर्शन धनंजय खाडिलकर यांचे आहे. या एकांकिकेमध्ये प्रामुख्याने धनंजय खाडिलकर, अनघा गपचूप, स्मिता जोशी, आरती गुप्ते व नुपूर खाडिलकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. साहित्यिक बबन पोतदार यांच्या प्रचंड गाजलेल्या ‘आक्रित’ या कथासंग्रहातील “मुक्ता” या कथेवर आधारित एकांकिकेचे सादरीकरण होणार असल्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांमध्ये उस्तुकता निर्माण झाली आहे.