
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला. बदल होण्यास सुरुवात झाली असून देशात बदलाचे वारे दिसत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, मागील पदवीधर निवडणुकीत जवळपास सगळीकडे भाजपला एखादी जागा सोडली, तर एक सुद्धा जागा मिळू शकली नाही. आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली आहे, त्याच्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, एकूण निवडणुकांवरुन देशात बदलाचे वारे दिसत आहेत. निवडणुका येथील त्यावेळी लोक सर्व निवडणुकीच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरुर करतील.
नागालँडला १२ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या सरकारमध्ये मान्यता प्राप्त विरोधी पक्षाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे. त्यासंदर्भात पक्षाच्या जनरल सेक्रेटरींना त्या ठिकाणी पाठवले आहे. ते संबंधितांशी चर्चा करुन याबाबतचा अहवाल मला पाठवतील, त्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
मी दोन दिवसापूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. यावेळी मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती दिली, काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असताना देखील कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला,त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि फडवणीस सरकार निर्णय घेत नसल्याची टीका पवार यांनी केली.
लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय
सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाने बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आहेत, मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेता ही याच्यामध्ये आला, या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे