दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात येतआहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने हैदराबादच्या अरुण रामचंद्र पिल्लई नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्या प्रकरणातील ही 11 वी अटक असल्याचे सांगण्यात येत आहे. अबकारी घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
दिल्ली न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्याप्रकरणी 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, आता आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिसोदिया यांच्या कोठडीची गरज नाही. सिसोदिया यांना विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
आप नेत्याला पहिले पाच दिवस आणि नंतर दोन दिवस चौकशीसाठी सीबीआय कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी, सोमवारी न्यायालयाने अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात हैदराबादस्थित चार्टर्ड अकाउंटंट बुचीबाबू गोरांतला यांना सोमवारी जामीन मंजूर केला आहे.