
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड अंगद कांबळे
म्हसळा – महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद लघुपट स्पर्धेत अरुणोदय सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मर्या.खरसई या संस्थेने राज्यात चौथा क्रमांक पटकावला.सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे झालेल्या महालक्ष्मी सरस कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते रोख रक्कम पन्नास हजार,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी व्यावसायिक,हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांनी सहभागी घेतला होता.संस्थेने किशोर शिताळे यांच्या संकल्पनेनुसार राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ काळसुरी यांच्या यशोगाथेवर आधारित उमेद या नावाने लघुपटाची निर्मिती आम्ही आहोत Struggler ह्या यूट्यूब चॅनेलच्या सहकार्याने केली असून लेखन दर्पण जाधव,दिग्दर्शन अजिंक्य भोसले,छायाचित्रीकरण धनंजय म्हात्रे यांनी केले.अरुणोदय सु बे सहकारी संस्थेची स्थापना शासनाच्या विविध उपक्रमात युवकांना सहभागी करण्यासाठी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन रायगड यांच्या वतीने संस्थेने विविध विषयांवर जनजागृती, पथनाट्य, क्षमता बांधणी प्रशिक्षण आदी उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत.त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ग्राम विकास विभाग यांच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे संस्थेचे चेअरमन हेमंत पयेर यांनी सांगितले.