दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यात गत अनेक वर्षांपासून विकासाचा अनुशेष शिल्लक असून रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून कबनूरकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी छोटे मोठे उद्योग उभारणे आवश्यक असून तालुक्यातून १ लाख नागरिक प्रती वर्षी रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. यात ऊसतोड मजूर कामगारासह वेठबिगारी कामगारांची संख्या अधिक आहे. तालुक्यात एमआयडीसी मंजूर करावी, सिंचनाचे प्रमाण वाढवण्यासाठी लघू, मध्यम तलाव निर्मिती करावी, त्यासाठी निधी द्यावा, कोल्हापुरी बंधारेही उभारावेत, तालुक्यातील रस्ते विकासासाठीही निधी द्यावा. आरोग्य योजना व सुविधांसाठीही निधी द्यावा. लेंडी आंतरराज्य प्रकल्पासाठी भरघोस निधी द्यावा, तालुक्यातील लोहमार्ग मंजूर करावा, शीतगृहे
उभारावीत, फळ प्रकिया उद्योगाला चालना द्यावी, रोहयो अंतर्गत मोठया प्रमाणावर काम सुरु करावीत. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्या आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याचे कबनूरकर यांनी सांगितले.
तालुक्यातील स्थलांतरित नागरिकाचे समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत असून गत काळात त्यांनी तालुक्यात भेट देवून पाहणी केली होती तर ठाणे येथे स्थलांतर नागरिकांना विविध प्रकारची मदत केली होती. त्याचे स्मरणही या चर्चेच्या वेळी करुन देण्यात आल्याचे ते म्हणाले. तालुक्यासाठी मोठा निधी मंजूर करु असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे ते म्हणाले.