
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
हुतात्मा भगतसिंग, वीर राजगुरू, वीर सुखदेव यांना लाहोर येथील तुरुंगात सशस्त्र सैनिकांच्या कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते, तो भयानक तुरुंग,सर्वत्र धीरगंभीर वातावरण, भयसूचकता थोड्याच वेळानंतर तीन क्रांतिकारकांना फासावर चढवले जाणार इन्किलाब झिंदाबाद च्या घोषणा देत तीन तरूण निघाले होते. सकाळपासूनच तुरुंगाबाहेर मोठा जनसमुदाय जमला होता. साक्षात समोर मृत्यू दिसत असताना क्रांतीचा जयजयकार करणारे कोण होते? ते तरूण होते ,भारत मातेचे थोर सुपुत्र, सरदार भगतसिंग वीर राजगुरू, वीर सुखदेव होते,
त्यांनी मातृभूमी साठी केलेल्या कार्यांचा हा घेतलेला आढावा….
आज प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर अभिमान,स्वाभिमान पहावयास मिळत आहे ,जे सूर्य तेजापेक्षाही तेजस्वी आहे.मात्र भारतीयांच्या चेहऱ्यावरील हे तेज हजारो -लाखो देशभक्तांनी केलेल्या त्यागाचे फलित आहे.म्हणून असं म्हणावसं वाटतं. जिनके त्याग और बलिदान से
मिली है हमे आझादी,
उनका त्याग नजर नहीं आता।
यूॅं तो झोलियाॅं भर जाती है
मगर देने वाला नजर नही आता।।
इसवी सन 1600 मध्ये व्यापाराच्या उद्देशाने भारतामध्ये दाखल झालेल्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या नजरेतून भारतातील संपन्नता,सुबत्ता,भव्यता सुटली नाही, या कंपनीने गुजरात राज्यातील *सुरत* या ठिकाणी व्यापाराच्या दृष्टीने पहिली वखार स्थापन केली,
*आलेलं दुःख पचवलं की,*
*जगण्याची उमेद भेटते*
*जिथे झाडाला घाव घातला जातो*
*तिथेच नवी पालवी फुटते*
अन्याय ,जुलूम, शोषण अत्याचार या मार्गाने इंग्रजांनी भारतीयांच्या मनावर घाव घातला आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या मनात क्रांतीची नव-पालवी फुटली या क्रांतीरुपी ज्योतीच्या प्रकाश वाटेवर समस्त भारतीयांना घेऊन जाण्याच्या उद्देशाने हजारो क्रांतिकारक या मातीमध्ये जन्मास आले, त्यामध्ये सरदार भगतसिंग, वीर राजगुरू,वीर सुखदेव यांचा इतिहास आपल्या रोमा रोमात भरलेला आहे,त्यांच्याकडून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन आपण आज चालत आहोत, *मनुष्याकडून मनुष्यावर होणाऱ्या शोषणाचा अंत करणे हे या क्रांतिकारकांचे ध्येय होते*. भारत मातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणे क्रांतिकारकांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले तो दिवस होता *15 ऑगस्ट 1947* हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला.
हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाचे सार्थक झाले पण भारताला पारतंत्र्याच्या काळात क्रांतीकारकांनी केलेल्या कार्यरूपी आठवणींना उजाळा देण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे, क्रांतिकारक आपल्यातून देशासाठी प्राण दिले, त्यामुळे त्यांचे कार्य व विचार आपणाला कायम स्वरूपी प्रेरणा देणारे ठरले. क्रांतिकारकांचे कार्य व विचार यातून आजच्या पिढीमध्ये देशप्रेम , स्वाभिमान जागृत व्हावा तो वाढावा. सरदार भगतसिंग हे धर्मनिरपेक्षतेचे आग्रही होते,त्यांनी कार्लमार्क्सला गुरु मानले होते, आर्थिक सत्ता व बदल,
सर्व क्षेत्रात घडणाऱ्या सर्व घडामोडी इतिहासापासून निर्माण होतात हे मत त्यांना पटत होते. सरदार भगतसिंग यांना नावापुरते स्वातंत्र्य नको होते. आर्थिक व सामाजिक विषमता मानवाने निर्माण केली, गरीबी दूर न करता खरे स्वातंत्र्य आपल्याला मिळेल काय? धर्म हा भीतीपोटी उद्भवलेला महाभयंकर रोग आहे, शेतकरी, कामगार,विद्यार्थी ,शिक्षक यांच्या शिवाय क्रांती होऊ शकत नाही असे ते परखडपणे मांडत, महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन ते चळवळीत सहभागी झाले, त्यांच्या सहकार्यांनी व शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले, पुढे त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात विधिमंडळात बॉम्ब स्फोट केला, म्हणूनच ते *शहीद-ए- आझम* झाले. भगतसिंगाचे विचार आज ही अतिशय महत्त्वाचे ठरतात,
हिंदू आणि मुस्लिम यांचा सलोखा असणारे ते एक क्रांतिकारक होते. त्यांनी धर्माची व राजकारणाची कधीही सांगड घातली नाही. त्यांनी केलेले लेखन चिंतनशील होते.
रशियातील बोल्शेविक क्रांतीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच वंचितांचे दुःख, शेतकऱ्यांचे प्रश्न
कष्टकरी, कामकरी याबाबत त्यांनी लेखण केले,सरदार भगतसिंगला लोकप्रियता त्यांच्या धाडसी पणाला मिळाली . कारण त्यांचा धाडसी स्वभाव, धावपळीत ही वाचन
,निर्भयता, सच्चा राष्ट्रभक्त हे गुण पाहून आपण थक्क होतो ,अवघ्या बारा-तेरा वर्षात त्यांनी गांधीवाद, राष्ट्रवाद, क्रांतिकारक, समाजवादी असे वैचारिक लेखन केले.
*वीर शिवराम राजगुरू* कधीही देश सेवेकरीता बलिदान करण्यासाठी पुढे येत असत त्यामुळे त्यांना त्यांचे मित्र *शहादत की बेताब आशिक* असे म्हणू लागले होते. देशासाठी आपण सर्वात अगोदर बलिदान करावे, म्हणून ते सर्व क्रांतिकार्यात हिरेरीने पुढाकार घेत असत, वीर राजगुरूची सरदार भगतसिंग यांच्यावर विशेष श्रद्धा होती. सरदार भगतसिंगांच्या अगोदर हौतात्म्य व्हावे अशी नेहमी त्यांची इच्छा होती.
1927 मध्ये भारतात सायमन कमिशन आले, त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीयांनी *सायमन गो बॅक* अशी हाक दिली, त्यावेळेस इंग्रज अधिकारी साॅर्डर्सने लाला लजपतराय यांना लाथा बुक्क्यांनी मारून जखमी केले, काही काळानंतर त्यांचे निधन झाले, तेव्हा शिवराम राजगुरूंना हे सहन झाले नाही,आता त्यांच्यासमोर एकच व्यक्ती दिसत होता, तो म्हणजे सॉर्डर्स होय.त्यासाठी वीर राजगुरूचे रक्त अंगात सळसळत होते ,आणि ते सरदार भगतसिंगला भेटले त्या दुष्ट साॅर्डर्सला मारल्या शिवाय मी शांत बसणार नाही, त्यांनी असा हट्ट धरला, तेव्हा सरदार भगतसिंगाने सुखदेवची नियुक्ती केली आणि बरोबर वीर राजगुरूही सोबत होते, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना साॅर्डर्सवर राजगुरूंनी गोळ्या झाडल्या, आणि लालाजीच्या मृत्यूचा बदला घेतला. पंजाबकडे ज्या क्रांतीकारी संघटना कार्यरत होत्या त्या संघटनेच्या प्रचाराची जबाबदारी सुखदेव यांच्याकडेच होती, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोघांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. कारण *सरकारने नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके दाखल केली* त्यामध्ये भगतसिंग व बटुकेश्वर पकडली गेले, बॉम्ब कसे बनवावे, त्याची माहिती सुखदेवला होती आणि संघटनेची जबाबदारी सुद्धा सुखदेव वरच येऊन पडली, आग्रा या ठिकाणी सुखदेवनी जे खोल वापरले होते तेच त्यांनी लाहोर येथे आणले होते, सुखदेवनी फिरोजद्यीन यांच्याशी संधान बांधून साचे ओतण्याचे काम करून घेतले, बाॅम्ब विधिमंडळात टाकण्यासाठी तयार करून दिले, पोलिसांचा अनेक वेळेस ससेमिरा चुकविण्यात आला परंतु शेवटी हे तीनही वीर इंग्रज पोलिसांच्या हाती लागले या निर्दयी पोलिसांनी 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे तीनही क्रांतिकारकांना फासावर लटकवले. सुखदेवच्या स्मृतिप्रित्यर्थ लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले.भारत पाकिस्तान फाळणीनंतर हुसेनिवाला हा भाग पाकिस्तान मध्ये गेला होता ;पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग आपल्याकडे ठेवला. सन 1968 मध्ये भारत सरकार तर्फे सरदार भगतसिंगाचे स्मारक उभारण्यात आले,
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या जन्म गावाचे नामांतर करून *राजगुरुनगर* असे ठेवण्यात आले
या तीन क्रांतीकारकांचे शौर्य आणि त्यांचा त्याग ,धाडस परखड विचार सरणी पुढे आपण नतमस्तक आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती देणाऱ्या या महान क्रांतिकारक हुतात्म्याचे नाव स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले आहे.
तो तुरुंग ते उपवास
सोसला किती वनवास,
कुणि फासावरती चढले
जे देशासाठी लढले!
अशा महान क्रांतिकारकास शहिद दिनी विनम्र अभिवादन
शब्दांकन
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता.मुखेड