
मुंबई : कोणताही गाजावाजा न करता संयमपणा राखत खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणारा राहुल द्रविड भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड प्रशिक्षकपदी आल्यापासून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
न्यूझीलंडविरोधातील टी-२० मालिक जिंकत राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली आहे. दरम्यान आता कानपूरमधील कसोटी सामन्यासोबत राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचीही कसोटी लागणार आहे.
दरम्यान कानपूरमधील कसोटी सामन्याआधी राहुल द्रविडने असं काही केलं की ज्याचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. यासोबतच श्रेयस अय्यरने कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. मैदानात लिटिल मास्टर सुनील गावसकरांनी श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप दिली. अशाप्रकारे राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंच्या हस्ते नव्या खेळाडूंना डेब्यू कॅप देण्याची पंरपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे.
याआधी भारतीय संघाने न्यूझीलंडविरोधात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली आहे. या मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला. या मालिकेत जलद गोलंदाज हर्षल पटेलने पदार्पण केलं होतं. तेव्हा राहुल द्रविडने माजी गोलंदाज अजित आगरकरच्या हस्ते हर्षलला डेब्यू कॅप दिली होती.
माजी दिग्गज खेळाडूंच्या हस्ते युवा खेळाडूंना डेब्यू कॅप देण्याची परंपरा ऑस्ट्रेलियात आहे. हीच परंपरा भारतातही आहे. मात्र गेल्या काही काळापासून ही परंपरा खंडीत झाली होती. गेल्या काही काळापासून संघातील वरिष्ठ खेळाडू किंवा स्टाफ सदस्य डेब्यू करणाऱ्या खेळाडूला टोपी देत होता.