
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील हाडोंग्री येथे भगवान श्री. रामदरबार, श्री. गणेश, श्री. महादेव पिंड, श्री. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व सहा शिखरावर कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात गुरुवर्य विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मानूरकर महाराज, गुरुवर्य रायलिंग शिवाचार्य महाराज परंडेकर यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने गावात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.
गावात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा असल्याने गावकऱ्यांनी घरावर गुढ्या उभारल्या होत्या. त्यामुळे गावाला उत्सवाचे स्वरूप आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, संजीवनी दूध प्रकल्पाचे चेअरमन अमेय पाटील हाडोंग्रीकर,ध्यान केंद्राचे आदित्य पाटील हाडोंग्रीकर तसेच गावकऱ्यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती . यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.