दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
राज्याच्या राजकारणात आता छत्रपती संभाजीनगरची वेगळी ओळख निर्माण होत आहे. 2 एप्रिलला महाविकास आघाडीची पहिली ‘वज्रमूठ सभा’ छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. मात्र आता त्याच दिवशी भाजपकडून छत्रपती संभाजीनगर शहरात ‘सावरकर सन्मान रॅली’ काढली जाणार आहे. भाजपचे आमदार तथा सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ सभे’ नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील ‘धनुष्यबाण यात्रा’ छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
सद्या राज्याच्या राजकारणात एका सभेला दुसऱ्या सभेने उत्तर देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीच्या राज्यभरात होणाऱ्या वज्रमुठ सभेला देखील भाजप आणि शिंदे गटाकडून उत्तर देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची एकत्रित सभा राज्यभरात होणार आहे. याची सुरवात छत्रपती संभाजीनगरमधून 2 एप्रिलला होणार आहे. मात्र याच सभेच्या दिवशी भाजपकडून शहरातील वेगवेगळ्या तीन मतदारसंघात ‘सावरकर सन्मान रॅली’ काढली जाणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप महाविकास आघाडीला यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.