दै चालु वार्ता वृत्तसेवा /
धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे गावी कीर्तन सुरु असतानाच त्यांनी देह ठेवला.गावातील राम मंदिरामध्ये सुरु असलेल्या सप्ताहा दरम्यान कीर्तन करत असताना महाराजांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांनी कीर्तनातच प्राण सोडला. प्रख्यात कीर्तनकार हभप ताजोद्दीन शेख महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुस्लिम धर्मीय असून देखील हभप ताजोद्दीन शेख महाराज हिंदू देवी-देवतांचे कीर्तन करत असत. वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून त्यांची ओळख होती. सोमवार २७ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन करत होते. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी व्यासपीठावर देह ठेवला.
भाविकांनी त्यांना तात्काळ शनिमांडळ येथील रुग्णालयात नेले, त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नंदुरबारमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ताजोद्दीन महाराज यांचं कार्य खूप मोठं होतं. धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
.