
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांची चढाओढ चालू असताना आज अचानक इंदापूर तालुका काँग्रेस कडून सोसायटी मतदार संघातून संध्या काकासाहेब देवकर यांनी महिला राखीव जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे आता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.२०१९ नंतर इंदापूर तालुक्यातील काॅंग्रेस पक्ष हा प्रत्येक निवडणुकीत सावध भूमिका घेत होता. कोणतीही निवडणूक लढविण्यासाठी सामोरे जात नव्हता पण या वेळी मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस काकासाहेब देवकर यांच्या पत्नी संध्या काकासाहेब देवकर यांनी काॅंग्रेस पक्षाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे आता ‘एकच फाइट, वातावरण टाइट…” अशी इंदापूर तालुक्यात निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे चे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अजुन काही उमेदवारी अर्ज काॅंग्रेस कडून दाखल करण्यात येणार आहेत असे इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर व इंदापूर तालुका काँग्रेस चे कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांनी सांगितले.
संध्या काकासाहेब देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, इंदापूर तालुका काँग्रेस चे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस काकासाहेब देवकर, हनुमंत बाबर, नागनाथ देशमुख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.