
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-अनिल पाटणकर
धनकवडी – प्रत्येक सण अत्यंत आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करण्याची ख्याती असलेल्या धनकवडी परिसरात यावर्षीची रामनवमीही अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी धनकवडी येथील धर्मरक्षक दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत प्रभू रामचंद्र,छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे रथांसोबत मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपल्या हातात भगवी पताका घेऊन जय श्रीराम…जय श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्र की…… जय…. असा गजर केला होता.यावेळी प्रत्येक पुरुषाच्या अंगावर सफेद सलवार कुर्ता,डोक्यावर भगवी टोपी,फेटा आणि गळ्यात भगवा शेला असा पोशाख तर मराठमोळी नथ आणि नऊवारी साडी परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या.
सकाळपासून विविध ठिकाणी रामजन्म सोहळा पार पडला तर संध्याकाळी भारती विद्यापीठाजवळून सुरु झालेली मिरवणूक त्रिमूर्ती चौक,आंबेगाव पठार राम मंदिर,गणेश चौक,धनकवडी गावठाण मार्गे ,धनकवडी येथील शेवटचा बसथांबा येथे रात्री १०.०० वाजता पोहचल्यानंतर आरती करण्यात आली व या शोभायात्रेची सांगता करण्यात आली.या शोभायात्रेत धनकवडी भागातील सर्वच राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते व विविध मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.