
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (धारणी) :- शुक्रवारी दुपारी धारणी शहराच्या अचानक मोठमोठे ढग दाटून आले आणि त्यानंतर गारपीट,मुसळधार पावसाने चक्रीवादळासह कहर केला.अवघ्या दहा मिनिटांच्या या वादळाने संपूर्ण शहर हादरले.घरातील भांडी,लोकांच्या घरावरील टिनाचे छप्पर उडून गेले.पथदिव्याचे खांब पडले,अनेक झाडे उन्मळून पडली.एवढेच नाही तर धारणीत आज भरणारा आठवडी बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसत होते.आकाशात अचानक झालेल्या कहरामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि काही वेळाने आकाश निरभ्र झाले.
सकाळपासून धारणी शहरातील परिस्थिती सामान्य होती.आकाशात छोटे ढग घिरट्या घालत होते.धारणीच्या आठवडी बाजारामुळे आजूबाजूच्या गावातील व्यापारी व खरेदीदार मोठ्या संख्येने पोहोचले होते.संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू होते.अचानक 2 वाजता आकाशात ढग वेगाने जमा झाले आणि त्यानंतर जोरदार वारा वाहू लागला.धारणीत चक्रीवादळाने जोरदार एन्ट्री करत वाऱ्यासह हरभरा सारखा पाऊस आणि गारपीट सुरू झाली.धारणीच्या इतिहासात आजपर्यंत इतके जोरदार वादळ आले नसल्याचे सांगण्यात आले.
या वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले.लोकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले.एवढेच नव्हे तर लोकांच्या अंगणात ठेवलेली भांडी,ताटंही हवेत उडू लागली.आठवडी बाजारात लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतांना दिसत होते.व्यापाऱ्यांचा माल पाण्यात भिजून कोसळला.बाजारात लावण्यात आलेल्या दुकानांचे पालाचे पडदे वाऱ्यावर उडून गेले.क्षणार्धात सारा बाजार उद्ध्वस्त झाला आणि आजूबाजूला शांतता आणि विध्वंस होता.वादळामुळे लोकांमध्ये घबराट आणि फक्त घबराट निर्माण झाली.दहा मिनिटांनंतर सर्वकाही स्पष्ट झाले.जणू काही कुठले वादळचं आले नाही,परंतु त्या दहा मिनिटांत सर्वकाही उद्ध्वस्त झाले.अनेक झाडेही नष्ट झाली.झाडे पडल्याने रस्ते बंद पडले.शेतकऱ्यांचा परत एकदा अतिवृष्टीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला.वृत्त लिहेपर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी,या वादळात किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असून,प्रशासनाकडून पंचनामा केल्यानंतरच सत्य बाहेर येईल.