
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक एप्रिल अखेरीस होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी नेत्यांचा कस लागणार असून, यामधे विजयाची पताका कोणाच्या हातात द्यायची..? याचा फैसला सुज्ञ मतदारांच्या हाती आहे. तथापि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून रिसोड तालुक्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आपसूकच येथील बाजार समितीची निवडणूक संपुर्ण जिल्ह्यासाठी लक्षवेधी ठरणार आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची रिसोड ही मातृभूमी असल्याने सदर निवडणूक अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.यामधे बऱ्याच जून्या चेहऱ्यांचा समावेश असून, पूर्वीच्या भ्रष्टाचारात नाव गोवलेले काही इच्छुक सुद्धा गुढघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची माहिती समोर येत आहे.परिणामी, अशा उमेदवारांना पुन्हा,पुन्हा संधी देणाऱ्या गटाची ” गोची ” होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
राजकारणाचा अड्डा म्हणून समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला राजकीय क्षेत्रात विशेष महत्त्व आहे.त्यामुळे सदर समित्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांचा कस लागणार असून त्यामधे प्रामुख्याने युती कोणासोबत करायची, युतीमध्ये समाविष्ट असलेल्या गटांमध्ये जागा वाटपाचे समांतर गुणोत्तर साधून साखळी पद्धतीने होणाऱ्या मतदानात गुंतागुंत होणार नाही आदी बाबींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय राज्यात सत्तासंघर्षातून घडलेल्या बदलाचा परिणाम बाजार समितीच्या निवडणुकीत पहावयास मिळणार असून, ज्यांची राजकीय आयुष्यात कधीच युती झाली नाही व होणारही नाही असं वाटतं असताना ही मंडळी बाजार समितीच्या निवडणुक निमित्ताने सर्वप्रथम एकत्र आल्याचे सर्वसामान्यांना पहावयास मिळणार असून आजतागायत ज्यांनी एकमेकांना तन, मन, धनाने राजकीय मदत केली ते राज्यातील राजकीय घडामोडीमुळे वेगवेगळ्या पडलेल्या गटातून दुभंगल्या गेल्यामुळे बाजार समित्यांची होऊ घातलेली निवडणूक अतिशय गुंतागुंतीची होणार असल्याचे सहकार क्षेत्रातील काही तज्ञ दिग्गज बोलत आहेत.