दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या पुतळ्यावर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात.
या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. शरणू सलगर पुतळ्यावर पाय ठेवून फोटो काढताना दिसल्याने अनेक भाविक संतप्त झाले आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत ‘हिंदुत्व’ आणि प्रभू रामाच्या श्रद्धेबाबत भाजपकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भाजप नेत्यांनी देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने इतर अनेक घटनांचा ही उल्लेख केला. दाव्यांप्रमाणे खरच हिंदू धर्मरक्षक आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला आहे.
दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण हे कृत्य केले असून स्वत:हून तसे करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, अस शरणू सलगर यांनी म्हटलं.