
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जळगाव : केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे, तर यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या लढवाव्यात, असे संकेत तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी दिले असून,
पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील; त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी येथे केले.
येथील माजी सैनिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहकार मेळावा व सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. खडसे म्हणाले, की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करणाऱ्या आणि विधिमंडळाच्या आवारात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्या पक्षासोबत काँग्रेस कशी युती करू शकेल? त्यांना काही अस्मिता आहे की नाही? असा प्रश्न विचारून यापुढे सर्वच निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढविण्यात येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशभर विरोधी पक्षांचे एकत्रिकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, सर्व पक्ष एकत्र राहिले तरच भाजपचा पराभव होईल.
जिल्हाध्यक्ष पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करून कांद्याप्रमाणे कपाशीलाही अनुदान द्यावे, अशी मागणी केली. माजी आमदार अरुण पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्या पाहिजेत, असे सांगून बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाचे नेते आदेश देतील, त्याप्रमाणे पॅनल करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील आणि शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. पक्षाचे शहराध्यक्ष मेहमूद शेख आणि महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रेखा चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष विनायक महाजन, युवक कार्यकर्ते योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांनी श्री. खडसे यांचा सत्कार केला.
मुरलीधर तायडे, वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, रमेश महाजन, अभिलाषा रोकडे, राजेश वानखेडे, प्रल्हाद बोंडे, राजेंद्र चौधरी, प्रकाश पाटील, माया बारी, योगिता वानखेडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सहकारी सोसायट्यांतील पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.