
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
- अमरावती :- अमरावती- बडनेरा राज्यमार्गावरील इर्विन ते राजापेठ उड्डाण पूलावरील विस्तार सांध्याच्या ठिकाणी रबर पॅड झिजून निकामी झाले.तथापि,गॅपमध्ये कोणताही बदल झाला नाही.पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असून पुलाची कुठलाही हानी झाली नाही,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे यांनी दिली.
शहरातील इर्विन चौकाकडून राजापेठकडे जाणाऱ्या १ हजार ३२० मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत २००८ पूर्ण झाले.पुलावर दि.३० मार्च रोजी स्तंभ क्र.३२ मधील वळणाकार ठिकाणी विस्तार सांध्यामधील (एक्स्पान्शन जॉईंट) मधील रबर पॅडची झीज होऊन निकामी झाले.त्यानुसार औरंगाबाद येथील संकल्पचित्र विभाग (पूल) येथील कार्यकारी अभियंता व अमरावती सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी स्थळ पाहणी केली.
या विस्तार सांध्यातील रबर पॅड निकामी झाले तरीही गॅपमध्ये कोणताही बदल झालेला नाही.पुलाचा स्लॅब व पिअर्सला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे.रबर पॅड बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.त्यासाठी अंदाजे ३० दिवस लागतील,असे श्री.मेहेत्रे यांनी सांगितले.