
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी:-किरण गजभारे
धर्माबाद-जोमाने चार तालुक्यातील २५ गावाची बाजारपेठ म्हणून उदयास येत असलेल्या मौजे. कारेगाव फाटा येथे आज तागायत कोणतीच बँक नसल्याचे धक्कादायक वृत्त असून येथे राष्ट्रीयकृत बँकेची अत्यंत गरज असून तशा प्रकारची मागणी पत्रकार तथा प्रसिद्ध कापड व्यापारी सूर्यकांत शिंदे यांनी दैनिक चालू वार्ता कडे केली आहे.
धर्माबाद तालुक्यातील मौजे कारेगाव फाटा येथे नवीन नवीन प्रतिष्ठाने होऊ लागले असून कापड दुकान, हॉटेल व्यवसाय, कृषी विषयक प्रतिष्ठाने, बार अँड रेस्टॉरंट, देशी दारू दुकान, धाबे, वेल्डिंग वर्कशॉप, मोटार मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकानिक, रेडीमेड कपड्यांचे दुकाने झपाट्याने वाढत असून जवळच असलेला वाघलवाडा साखर कारखाना यामुळे कारेगाव फाट्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून जोमाने नवीन बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. आणि या बाजारपेठेंशी संलग्नित जवळपास चार तालुक्यातील २५ ते २७ गावे आहेत. जेणेकरून ती आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.
यामध्ये प्रामुख्याने उमरी तालुक्यातील गोळेगाव, वाघलवाडा, चिमणापूर, कावलगुडा (खुर्द), कावलगुडा (बुद्रुक), हस्सा, बिजेगाव ,कौडगाव, येंडाळा, महाटी, बोळसा अशी गावी असून नायगाव तालुक्यातील गोदावरी नदीपलीकडली राहेर, आणि हुस्सा ही गावे आहेत. तर बिलोली तालुक्यातील कामठी, खपराळा, कोळगाव, हरणाळा व तोरणा हे गावे कारेगाव फाट्याशी संलग्नित असून धर्माबाद तालुक्यातील चोळाखा, बेलगुजरी, हारेगाव, ईळेगाव, पिंपळगाव, सालेगाव ,आटाळा ,येल्लापूर आणि कारेगाव व कारेगाव फाटा इत्यादी गावे कारेगाव फाटा येथील बाजारपेठेंशी संलग्नित झाली असून येथे मोठे आर्थिक व्यवहार होत असतात.
पण आश्चर्य असे आहे की झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या कारेगाव फाटा येथे अद्याप एकही बँक नाही व तत्कालीन पुढाऱ्यांना त्या ठिकाणी बँक होणे गरजेचे आहे हा दूरदर्शीपणा आलाच नाही ही एक शोकांतिका असून बँकेच्या व्यवहारासाठी उपरोक्त सर्व गावच्या लोकांना एक तर बिलोली नायगाव उमरी किंव्हा धर्माबाद या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. पण कारेगाव फाट्याच्या वर्तुळात उपरोक्त सर्व गावांना आपापले तालुक्याचे ठिकाण अतिशय दूर पडत आहे. त्यामुळे कारेगाव फाटा येथे एक राष्ट्रीयकृत बँक होणे गरजेचेच असून त्या प्रकारची मागणी पत्रकार तथा कापडाचे कारेगाव येथील प्रसिद्ध व्यापारी सूर्यकांत शिंदे यांनी दैनिक चालू वार्ता कडे करीत तिथल्या ग्राहकांच्या व्यथा सांगितल्या.
उपरोक्त पार्श्वभूमीवर दैनिक चालू वार्ताने आमदार राजेश पवार यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून कारेगाव फाट्यांच्या नागरिकांच्या समस्या सांगून तेथे एक राष्ट्रीयकृत बँक असणे गरजेचे असून त्या दिशेने आपण प्रयत्न करा असे सांगितले असता हे प्रयत्न आपण अगोदर पासूनच चालू केले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ही आपण कारेगाव फाटा व नायगाव मतदारसंघातील अशा प्रमुख ठिकाणी नवीन राष्ट्रीयकृत बँकेसाठी निवेदन दिले असून त्या दिशेने पाठपुरावाही चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया-
कारेगाव फाटा येथे नवनवीन प्रतिष्ठानांची अत्याधुनिक बाजारपेठ उदयास येत आहे. त्यामुळे कारेगाव फाटा पंचक्रोशीतील जवळपास २५ ते २७ गावांच्या समस्या मिटत असल्या तरी येथे एकही बँक नाही ही एक शोकांतिका असून तत्कालीन राजकीय नेतृत्व करणाऱ्यांची ही अक्षम्य चूक आहे. दूरदर्शीपणा असला तर या ठिकाणी आज पर्यंत साधी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा स्थापन झाली असती. पण त्या दिशेने कुणाचेच प्रयत्न झाले नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट असून भविष्यात येथे बँक होण्यासाठी आपण तीव्र आंदोलन छेडू अशा प्रतिक्रिया कारेगाव फाटा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हनमंतराव जगदंबे यांनी दैनिक चालु वार्ता जवळ दिल्या.