दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली: / पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपमध्ये जाणार? पंजाबमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपमध्ये जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच आज अमरिंदर सिंह नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतील. दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत त्याचे वाद असल्याचं बोललं जातं. त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्याजागी चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचा नवा मुख्यमंत्री बनवलं. त्यामुळेच आता शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या वादाला कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंह पक्ष सदस्य पदाचाही राजीनामा देऊ शकतात.
असं असलं तरी, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत, ते म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल अनेक बातम्या येत आहे, मात्र ते दिल्लीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत, तिथं ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार आहेत आणि नवीन मुख्यमंत्र्यांसाठीचं कपूरथलाचं घरही ते रिकामं करणार आहेत. त्यामुळे अशा शक्यता वर्तवणं चुकीचं आहे.