
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर( दि.०६) देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथील हणेगाव ते बिजलवाडी रस्त्यासाठी तीन वर्षापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांची मोठी निराशा झाली असून हा रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते,परंतू दोनच दिवसात हा रस्त्या उखडून जाण्यास सुरुवात झाली आहे. परंतू या रस्त्याच्या कामाला गुत्तेदार व उपविभागीय अभियंता यांच्या संगनमताने रस्त्याची विल्हेवाट लावली असून या रस्त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असे निवेदन युवासेना तालूका समन्वयक भागवत पाटील सोमूरकर यांनी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.
सविस्तर माहिती असे की, हणेगाव येथील बाजारपेठ देगलूर तालुक्यात सर्वात मोठा बाजारपेठ असून या बाजारपेठेला आजुबाजूला पंधरा ते वीस खेडेगाव लगत असून या बाजारपेठेला ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे या भागातील नागरिकांचा कर्नाटक राज्यात जास्त ओढ वाढल्यामुळे हणेगाव बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे.
परंतू हणेगाव ते बिजलवाडी या रस्त्यामुळे हणेगाव बाजारपेठेला किमान पाच ते सहा गावांची सोय होते या अपेक्षेने या भागातील नागरिक आनंदात असताना दोन दिवस अगोदर बनविलेल्या रस्त्याचे बारा वाजले असून या भागातील नागरिकांच्या पदरी निराशाच आली आहे.
त्यामुळे या रस्त्याचे गुणनियंत्रण पद्धतीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असे निवेदन युवासेना तालूका समन्वयक भागवत पाटील सोमूरकर यांनी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांना दिले आहे.