
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा अवैध धंदे करणाऱ्यांवर मंठा पोलिसांनी कारवाईचा सपाटाच लावला आहे. दोन ठिकाणी छापे टाकून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटाच सुरू केला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात मंठा पोलिस ठाणे पहिल्या क्रमांकावर आले होते. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी संजय देशमुख यांचा सत्कार केला होता. दरम्यान, मंठा शहरातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून जुगार साहित्यासह ६८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तर दुसऱ्या कारवाईत बसस्थानकाच्या पाठीमागील गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून ११ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह १ लाख ८३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास हे. कॉ. चव्हाण हे करत आहेत.