
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :-शासनाच्या “गाव तेथे प्रवासी निवारा” या योजनेंतर्गत आमदार निधीतून प्रवासी निवार्यांचे बांधकाम करण्यात येते.परंतु,अंजनगाव सुर्जी सारख्या तालुकास्थळी प्रवासी निवारण असल्यामुळे नागरिकांना उन्हात ताटकळत बसावे लागत आहे.येथील अंजनगाव सुर्जी-अकोट रोडवरील जुना बस स्टॉप असो वा अंजनगाव सुर्जी-दर्यापूर रोडवरील टाकरखेडा नाका असो प्रवाशांना बस थांबा नसल्यामुळे भर उन्हात ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे.उन्हाचा पारा वाढत असून सध्या गाव तेथे प्रवासी निवारा,या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.
विशेषतः प्रवासी नोकरी,व्यवसायासह इतर विविध कामांसाठी नागरिकांची वर्दळ असून सुद्धा याबरोबरच बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे.त्यामुळे प्रवाशांची सतत ये-जा असते.मात्र,बसथांबा नसल्याने प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात ऊन्हापासून बचाव करण्यासाठी इतरत्र उभे रहावे लागत आहे.परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते.निवारा नसल्याने प्रवाशांना वाढत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे.दरम्यान,प्रवासी बसच्या प्रतिक्षेत भर रस्त्यात थांबतात.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.उन्हाच्या झळादेखील वाढू लागल्याने प्रवाशांना बस थांब्यावर थांबणे असह्य होत आहे.विशेषतः लहान मुले,महिला व वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी निवारा उभारावा,अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.