
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन टीम पेन याने अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्या प्रकरणात राजीनामा दिला होता.अॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन कोण होणार हा प्रश्न अखेर मिटला आहे.
पेनच्या जागी ऑस्ट्रेलियानं फास्ट बॉलर पॅट कमिन्सची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. कमिन्स यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. पेनचा उत्तराधिकारी म्हणून त्याचं नाव सर्वात आघाडीवर होतं. अखेर त्याच्या नावावर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शिक्कामोर्तब केले आहे.
कमिन्सच्या रुपाने 1956 नंतर म्हणजे तब्बल 65 वर्षांनी फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन बनला आहे. ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून स्टीव्ह स्मिथची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मिथ यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीमचा कॅप्टन होता. 2018 साली झालेल्या सँडपेपर प्रकरणामुळे त्याला कॅप्टनसी सोडावी लागली होती.
त्यानंतर स्मिथच्या जागी पेन कॅप्टन बनला. आता पेनला वादग्रस्त प्रकरणामुळे पद सोडावे लागल्यानंतर स्मिथची व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2017 साली ऑस्ट्रेलियन टीममध्ये परतल्यानंतर कमिन्सच्या खेळात मोठी सुधारणा झाली आहे. त्यानं यानंतरच्या 35 पैकी फक्त 2 टेस्ट मिस केल्या आहेत. टेस्ट प्रमाणेच वन-डे आणि टी20 टीमचाही कमिन्स मुख्य सदस्य आहे. IPL 2022: राजस्थाननं दिग्गज खेळाडूला केलं रिटेन, बेन स्टोक्सला दिला धक्का!
अॅशेस सीरिजमधील पहिली टेस्ट 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कमिन्सपुढे ही प्रतिष्ठेची सीरिज जिंकण्याचं आव्हान असेल.